कायदा-सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर उतरू-धनंजय मुंडे

Dhananjay-Munde

नागपूर : राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळी आहे. गुन्हेगारीत महाराष्ट्र अव्वल बनला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती न सुधारल्यास रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज, गुरुवारी दिला. विधानपरिषदेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले की, गुन्हेगारी मुक्त समाजाचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांचं शहर असलेले नागपूर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात डिस्को थेकच्या नावावर डान्स बार सुरु आहेत. तिथं कोट्यवधी रुपयांची उधळण होते. ठाणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी बंद केलेले ४३ बार अप्पर मुख्य सचिवांनी दोन दिवसात ज्या तत्परतेने पुन्हा सुरु करुन दिले, ती तत्परता संशयास्पद असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.

नागपुरातील नामचीन गुंड मून्ना यादवला मुख्यमंत्री वैधानिक मंडळाचे पद दिले. नागपूर पोलिसांना मुन्ना यादवसारखा गुंड सापडत नसेल तर, डॉ. दाभोळकर, कॉम्रेड पानसरे साहेबांच्या हत्येमागचे सूत्रधार ते कसा शोधू शकतील, असा असा सवालही त्यांनी विचारला. राज्यातील महिला पोलिस अधिकारी दीड वर्षे संशयास्पदरित्या बेपत्ता होते. तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबिय वरिष्ठांचे उंबरठे झिजवतात. वरिष्ठ पोलिस अधिकारी दाद देत नाहीत. शेवटी न्यायालयाकडून निर्देश आल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागत असल्याचे ते म्हणाले. या अपयशाचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असंही. मुंडे यांनी स्पष्ट केले.