हिशोब तर होणारच, आणि व्याजासकट परत देखील करू,मुंडेंचा सरकारला इशारा

 टीम महाराष्ट्र देशा : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करावयास सोलापूरात आले होते. त्यावेळी जनतेने सरकारच्या विरोधात निदर्शने केली पण पोलिसांनी अत्यंत निष्ठुरपणे निदर्शने करणाऱ्याना लाथा बुक्यांनी मारहाण केली. निषेध व्यक्त करणाऱ्या आंदोलकांना झोडपून काढणाऱ्या पोलिस प्रशासनावर आता सर्वच स्तरातून टीका होते आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. “सगळ्यांचा हिशोब होणार, सूद समेत वापस करेंगे” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पोलिस प्रशासनासह राज्य सरकारला गर्भित इशारा ट्वीट करून दिला आहे.

धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले?

“हिटलरचा जिथे विरोध व्हायचा तिथे अशीच मुस्कटदाबी केली जात होती. शेवटी हुकूमशाहीचा अंत झालाच. जनता आता असा तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करणार नाही. या सगळ्याचा हिशोब होणारच, सूद समेत वापस करेंगे. परिवर्तन होणारच.”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी काल देखील सोलापुरात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला होता. प्रणिती शिंदे यांनी आपल्या ट्वीटर वरून सरकारला ‘आम्ही सरकार विरोधात आंदोलन देखील करू शकत नाही का?’ असा प्रश्न विचारला आहे.