शिर्डी विमानतळावर मुंबई-शिर्डी विमानाचा अपघात टळला

अहमदनगर : मागील वर्षी १ ऑक्टोबर रोजी चालू झालेल्या मुंबई-शिर्डी विमानाचा मोठा अपघात टळला आहे. मुंबईहुन ४२ प्रवाशांना घेऊन निघालेले एयर अलायन्सचे हे विमान शिर्डी विमानतळावर लँडींग होताना रन-वे ओलांडून १०० फुटांपर्यंत सरकले. दैव बलत्तर म्हणून सुदैवाने होणारा अपघात टळला व सर्व प्रवाशांचा जीव वाचला विमानातील असणारे ४२ प्रवासी सुखरूप वाचले. काल सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

एअर अलायन्सचे विमान धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान रनवेऐवजी रेखा एरियात घुसले. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली आणि विमानतळावर असलेल्या सुरक्षा पथकाचीही चांगलीच धावपळ झाली. सुदैवाने १०० फुटांवरच विमान थांबल्याने विमानात असणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविण्यात आले. सदर अपघाताच्या चौकशीचे आदेश तातडीने एअर इंडियाने दिल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.

एअर पोर्ट आॉथोरिटी ऑफ इंडियाने या घटनेचा अहवाल तात्काळ मागविला आहे. शिर्डी विमानतळावरून शिर्डी-हैद्राबाद, शिर्डी-मुंबई अशा दोन विमानसेवा मागील वर्षीपासून सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी १ ऑक्टोबर रोजी शिर्डी विमानतळाचे उद्घाटन झाले. साई भक्तासाठी मुंबई व हैद्राबाद या दोन शहरातून रोज फ्लाईट सुरु करण्यात आल्या आहेत. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्स या कंपनीची व्हीटीआर ७२ या प्रकारातील विमाने या मार्गावरून धावतात.