मुंबई महापालिकेने काढले लसीसाठी ग्लोबल टेंडर, १ कोटी डोसची केली मागणी

mumbai

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. या टेंडरद्वारे १ कोटी डोसची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

जगभरातील लस पुरवठादार कंपन्या या १२ मे ते १८ मे या कालावधीत ग्लोबल टेंडर भरु शकतील. लसींचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसाठी १८ मे हा ग्लोबल टेंडर भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर लस पुरवठा पुढील तीन आठवड्यात व्हायला हवा. टेंडर भरणाऱ्या कोविड लस पुरवठादार कंपनीला डिसीजीआय आणि आयसिएमआरचे निकष पूर्ण करणे अत्यावश्यक असेल. तर भारताच्या सीमेलगत असणाऱ्या देशांमधून येणारे कंत्राटदार हे टेंडर भरु शकणार नाहीत.

दरम्यान , आजपासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. लसींची कमतरता असल्यानं ही घोषणा केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. लसीचा पहिला डोस घेतलेल्या जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. त्यामुळेच, १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांना तूर्तास लसी दिली जाणार नाही. या गटासाठी खरेदी केलेल्या लसी ४५ पेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देणार,’ असं टोपे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या