कोरोना रोखण्यासाठी दिल्लीत ‘मुंबई मॉडल’ राबवणार; पाहणीसाठी टीम मुंबईत दाखल

mumbai

मुंबई : मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता.

दरम्यान, मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामांची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती. मुंबईच मॉडलचा अभ्यास का करत नाही?, असा सवालही कोर्टाने दिल्ली सरकारला केला होता. त्यानंतर दिल्ली सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आले. या प्रतिनिधी मंडळाने मुंबईतील ‘वॉर्ड वॉर रुम’, जम्बो रुग्णालयांची पाहणी केली. तसेच सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार असल्याचं या प्रतिनिधी मंडळाने स्पष्ट केले आहे.

या अंतर्गत प्रामुख्याने ‘वॉर्ड वॉर रुम’च्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्‍यवस्‍थापन, रुग्णालयांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जम्बो रुग्णालयांची माहिती घेतली. या प्रतिनिधींनी गोरेगाव येथील महापालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयाला आणि अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तिथे करण्यात येत असलेल्या सुव्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी या प्रतिनिधींनी महानगरपालिकेने केलेले कार्य अनुकरणीय असून दिल्लीत देखील लवकरच ‘मुंबई मॉडेल’ राबविण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP