मुंबई ला पुन्हा २६ जुलै ची आठवण…

मुंबई : २६ जुलै २००५ ला मुंबापुरी ही अक्षरशः तुंबापुरी झाली होती. नेहमी धावणारी मुंबई वरुणराजा च्या विक्राळ रूपाने थांबली होती. त्यानंतर आता २९ ऑगस्ट २०१७ ला मुंबई ला पुन्हा २६ जुलै ची आठवण झाली.

हवामानखात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा मंगळवारी पावसाने प्रत्यक्षात आणला आणि मुंबई परिसरात धो धो पाऊस कोसळला. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या बारा तासांमध्ये सांताक्रूझ येथे तब्बल ३१५.८ मिमी तर कुलाबा येथे १०१.८ मिमी पाऊस पडला. पावसाचे आतापर्यंतचे प्रमाण व वेधशाळेचा इशारा लक्षात घेता २६ जुलैनंतरचा हा सर्वाधिक पाऊस ठरत आहे.

बुधवारीही मुंबईसह कोकण किनारपट्टीवर काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यावेळी समुद्र खवळलेला असेल. २६ जुलै २००५ नंतर प्रथमच एवढा पाऊस पडला आहे. मात्र ही ढगफुटी नसल्याचे मुंबई हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

यावेळी ढगांची उंची २६ जुलैएवढी नव्हती. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असल्याने कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. बुधवारीही ही स्थिती कायम राहील, असे सांगण्यात आले आहे .