मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स : हार्दीक पांड्याने चेन्नईला डिवचले

टीम महाराष्ट्र देशा- रविवारी म्हणजेच १२ मे रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल मॅच खेळली जाणार आहे. आयपीएलचा खिताब तीन वेळा आपल्या नावावर केलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात फायनल मॅच रंगणार आहे.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं ट्विट करत अंतिम लढतीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत प्रतिस्पर्धी संघाला एकप्रकारे इशाराच दिला आहे. मी रॉयल लढाई करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत चेन्नईला डिवचले आहे. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या पंडय़ाकडून अंतिम फेरीतसुद्धा विजयवीराप्रमाणे खेळीची अपेक्षा आहे.

हार्दिक यंदा तुफानी फॉर्मात असून प्रतिस्पर्धी संघांना आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तडाखा दिला आहे. गोलंदाजीत देखील त्याने आपला करिश्मा दाखविला असून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.चेन्नईचा संघ आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा धडक दिली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत तीन फायनल लढती झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईनं दोन वेळा चेन्नईला पराभूत केलं आहे. एकदा धोनीच्या संघाकडून मुंबईचा पराभव झाला आहे.