खा.उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

Udayan Raje Bhosale

वेबटीम : साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. 2 महिन्यांनी या याचिकेवर सुनावणी घेत हायकोर्टाने उदयनराजे भोसलेंना दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. उदयनराजे यांच्यासहीत इतर नऊ जणांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ ‘सोना अलाईज’ नावाची कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे. याच कंपनीत दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात. निंबाळकरांच्या युनियनला भोसलेंच्या युनियनपेक्षा जास्त मोबदला दिला जातो अशा तक्रारी आल्यामुळे उदयनराजे भोसलेंनी जैन यांना 18 फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात बोलावलं होतं. त्यानंतर तक्रारदाराने दिलेल्या माहीतीनुसार त्यांच्या कंपनीशी संबंधित एका प्रकरणात उदयनराजे भोसलेंनी त्यांच्याकडे खंडणी मागितली. नकार देताच उदयनराजेंनी त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्याकडील पैसे आणि संबंधित कागदपत्रही जबरदस्तीने काढून घेतली.याप्रकरणी 12 एप्रिलला सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर उदयनराजेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर उदयनराजेंकडे केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्याय शिल्लक आहे. मात्र तूर्तास उदयनराजे भोसलेंना याप्रकरणात कधीही अटक होऊ शकते.