मुंबईत केवळ ‘इतकाच’ लसींचा साठा; महापौर पेडणेकरांची केंद्राकडे लस पुरवण्याची मागणी

kishori pednekar

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विविध सामाजिक संस्था देखील आवाहन करत आहेत.

यामुळे, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. शहरात सध्या फक्त १ लाख ८५ हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

लसीकरणाला मिळणार प्रतिसाद बघता लवकरच मुबलक साठा उपलब्ध करणे गरजेचे आहे. अन्यथा लसीकरण केंद्रावर आल्यानंतर नागरिकांना लस मिळाली नाही तर त्यांना पुन्हा लसीकरणासाठी आणणं अवघड होईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्राकडे कोरोना लसीसाठी पाठपुरावा करत आहेत. तसंच विरोधी पक्षनेतेही पाठपुरावा करत असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर लस उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र लसीकरणाच्या अग्रेसर असून आता लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.’ असं महापौर पेडणेकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या