न्याय मिळत नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही – नरेंद्र पाटील

मुंबई: जोपर्यंत धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. तसेच धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरी’ असा दर्जा देण्याचे आश्वासन सरकारने लेखी स्वरुपात द्यावे, अशी मागणीही नरेंद्र पाटील यांनी केली आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा जेजे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी अवयवदानाचा फॉर्म भरुन दिला होता. मृत्यूनंतर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील रहिवाशी होते. औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात केवळ चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली. हा मोबदला योग्य नसल्याने वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणाऱ्या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.