दिलासादायक : मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरुन आता १६ दिवसांवर

corona news

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड १९ बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी (Doubling Rate) आता १३ वरुन १६ दिवस झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या २४ पैकी ६ विभागांमध्ये तर हे प्रमाण २० दिवस इतके असून त्यात पूर्वी हॉटस्पॉट म्हणून ओळख बनलेल्या जी/दक्षिण, जी/उत्तर, एम/पूर्व विभाग यांचाही समावेश आहे. महानगरपालिका आयुक्त इ. सिं. चहल यांनी या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करुन सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, कोरोना बाधिताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नवीन निर्देशही दिले असून येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी कोविड १९ संक्रमण रोखण्यासाठी होत असलेल्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घेतला. या बैठकीला सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, रुग्णालयांचे प्रमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध कोरोना समर्पित रुग्णालये, आरोग्य केंद्र आदी मिळून आजपर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ४३ टक्के रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यासमवेत मुंबईत बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून १३ वरुन आता १६ दिवस इतका झाला आहे. म्हणजेच रुग्ण वाढण्याचा वेग मंदावतो आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीच्या सरासरी १६ दिवसांच्या तुलनेत काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये ई, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एम/पूर्व विभागांची ही सरासरी २० दिवस आहे. तर डि विभाग १९ दिवस, ए विभाग आणि एल विभाग १७ दिवस, के/पश्चिम विभाग १८ दिवस, बी विभाग १६ दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. रुग्ण बरे होण्याचे वाढलेले प्रमाण आणि संक्रमणाचा कालावधी वाढणे या दोन्ही कामगिरीबद्दल आयुक्त चहल यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच, मुंबईतील कोरोना मृत्यूदर देखील यापूर्वीच नियंत्रणात आला आहे. सध्या तो ३.२ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे.

विविध प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, कोरोना केंद्र यासह निरनिराळ्या मुद्यांचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त चहल यांनी प्रामुख्याने कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच योग्य ठिकाणी उपचारास नेईपर्यंत करावयाच्या व्यवस्थेमध्ये आणखी सुसूत्रता आणण्याचे निर्देश दिले. त्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळांनी (लॅब) कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर थेट व परस्पर रुग्णास दूरध्वनी किंवा मेसेज करुन कळवू नये, तर त्या बाधित रुग्णांची यादी तातडीने महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे पाठवावी. आरोग्य खात्याने त्यातून प्रशासकीय विभागनिहाय रुग्णांची नांवे संबंधित विभाग कार्यालयांना तातडीने पुरवावीत. विभाग कार्यालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या आंतरवासितांचे (इंटर्न) पथक नेमावे. या पथकाने संबंधित बाधित रुग्णाशी संपर्क साधून त्यांच्याशी योग्य चर्चा करावी, त्यांची माहिती घ्यावी व त्यांना आवश्यक त्या रुग्णालय अथवा केंद्रामध्ये नेण्यासाठी समन्वय साधावा, अशी सूचना आयुक्त चहल यांनी केली. त्यानुसार सुसूत्रता आणण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व कार्यवाही करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या. रुग्णालये किंवा वैद्यकीय तज्ज्ञांनी तातडीच्या प्रकरणांमध्ये कोरोना चाचणी करावयाची सांगितली असल्यास, त्या प्रकरणांत वैद्यकीय प्रयोगशाळांना थेट रुग्णालयास चाचणीचा अहवाल कळवता येईल, असेही आयुक्तांनी निर्देश दिले.

प्रयोगशाळांकडून पॉझिटिव्ह असल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर अनेकदा रुग्ण गोंधळून जातात किंवा महानगरपालिकेकडून रुग्णाशी संपर्क होण्याआधीच घाबरुन जाऊन रुग्णालयांची शोधाशोध करु लागतात. त्यातून इतरांना बाधा होण्याची शक्यता असते. हा गोंधळ व धावपळ टाळता यावी, त्यांना दिलासा देता यावा यासाठी ही सुसूत्र पद्धत आता अवलंबली जाणार आहे. त्यासमवेत, विभाग कार्यालये, रुग्णालये व कोरोना केंद्राच्या व्यवस्थांमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर आयुक्त चहल यांनी समाधान व्यक्त केले.