संजय निरूपमांनीच लिहून आणला प्रकाश मेहतांचा राजीनामा; कॉंग्रेसच मेहतांच्या विरोधात आंदोलन

वेबटीम : एसआरए घोटाळ्याचा आरोप असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळात विरोधक आक्रमक झाले आहेत . तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसने मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत आंदोलन केले. मुंबई कॉंग्रेसचे संजय निरुपम आणि सचिन सावंत यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान संजय निरुपम यांनी स्वतच: मेहता यांचा राजीनामा लिहून आणला होता . या राजीनाम्यावर सही करण्याचं आवाहन त्यांनी प्रकाश मेहतांना केलं. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मेहतांच्या घाटकोपरमधील घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी संजय निरुपम आणि सचिन सावंत यांना अडवलं.  त्यानंतर पोलिसांनी निरुपम आणि सावंत यांना ताब्यात घेतले आणि काही वेळाने सोडून दिले आहे .

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहता यांच्यावर करण्यात येत आहे