मुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार

टीम महाराष्ट्र देशा : बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्टपासून पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचे समोर आले आहे. कामगार संघटनेकडून बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवण्यात आले असल्याचे वृत्त आले आहे.

वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यांवर बेस्ट कामगार संघटनांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संप सुरु केला होता. त्यावेळी प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. यासोबतच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई देखील करण्यात येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कामगार संघटनांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यावेळी बेस्टच्या कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला.

याचदरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. बेस्ट युनियनने 16 मे 2016 रोजी बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्याप झाली नाही. असे म्हणत बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्टपासून संपावर जाणार असल्याचे बोलले जात आहे.

इतकेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाने, 2007 पासून बेस्ट उपक्रमात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वेतनवाढी, देण्याचे आणि 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणीही झाली, मात्र मध्यस्थीनंतर पुन्हा ही मुंबई उच्च न्यायालयात असफल अहवाल दाखल करण्यात आला आहे. असे कामगार संघटनांनी म्हंटले आहे.

तसेच लोकसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या कारणास्तव चर्चा होऊ शकल्या नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी आम्ही पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचे कामगार संघटनेने म्हंटले आहे.