मराठा क्रांती मोर्चा : मुंबई बंद स्थगित

mumbai band mage

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंद पाळण्यात आला होता. या दरम्यान, आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. तर मुलुंड टोल नाक्यावर टायर जाळण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता या ठिकाणचे बंदचे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून स्थगित करण्यात आले आहे. तर आंदोलकांना शांतता राखण्याच आवाहन देखील केलं आहे.

गंगापूर येथे झालेल्या मराठा युवकाच्या मृत्युनंतर राज्यभरात आंदोलक आक्रमक झाले आहेत, काल राज्यभरात बंद पाळण्यात आला होता, यावेळी अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर बस पेटवण्याच्या घटना देखील घडल्या होत्या. हेच चित्र आज मुंबईमध्ये देखील पहायला मिळत आहे.

मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

अशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता

मुलुंड टोल नाक्यावर मराठा आंदोलकांनी टायर जाळत रस्ता रोको केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. वरळीत देखील आंदोलकांनी बाईक रॅली काढत दुकाने बंद करण्याचे आवाहन केलं आहे.

दरम्यान, काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.