बारामती लोकसभेत मुळशीकर इतिहास घडवणार, नवा मुळशी पॅटर्न निर्माण होणार – काकडे

sanjay-kakde

मुळशी: मुळशीकरांनी अनेक मुळशी पॅटर्न राबविले व यशस्वी केले आहेत. आता मुळशी प्लानिंगकरून बारामती लोकसभा मतदार संघात इतिहास घडविण्याची संधी आहे. मुळशीकरांनी किमान 20 हजारांचे मताधिक्य दिल्यास हा इतिहास घडेल. मुळशीकर हा इतिहास नक्की घडवतील व आपण सर्वजण त्याचे साक्षीदार असू, असा ठाम विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजप-शिवसेना व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सतीश केदारी, रासपचे तालुकाध्यक्ष अतुल सुतार, स्वाती ढमाले आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदार संघात मुळशी पट्ट्यातील मतदान निर्णायक ठरणार आहे. आजपर्यंत या भागातील मतदार भाजप व शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिला. त्यामुळे या निवडणुकीतही मुळशीकरांनी भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना किमान 20 हजारांचे मताधिक्य दिले तर, बारामती लोकसभेत इतिहास घडेल व भाजपाचा उमेदवार विजयी होईल. असेही खासदार काकडे यावेळी म्हणाले.