fbpx

Mulashi Pattern Movie Review :भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’

टीम महाराष्ट्र देशा- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या ऊभ्या राहिल्या त्यांच्या पर्यंत या विकासाचा लाभ पोहोचला नाही. विकासाच्या नावाखाली भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा आज रिलीज झाला आहे.

ही कथा मुळशी तालुक्याची असली, तरी ती शहरांच्या बाजूला असलेल्या देशातील कोणत्याही भागाला लागू होईल. या कथेत आपली जमीन विकलेले एक शेतकरी कुटुंब आहे. गावचा पाटील आणि असलेल्या सखाराम (मोहन जोशी) या कर्त्या पुरुषाने जमीन विकून आलेले पैसे संपल्यानंतर त्याच बिल्डरकडे वॉचमनची नोकरी स्वीकारलेली आहे. वडिलांनी पैशांचा योग्य रितीने वापर न केल्याचे शल्य मुलगा राहुल (ओम भूतकर) याच्या मनात आहे.

आर्थिकदृष्ट्या हलाकीची परिस्थिती निर्माण झाल्याने गावात राहणे मुश्कील झाल्यावर हे कुटुंब पुणे शहरात येते. वडील मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करू लागतात. एका झटापटीत मुलगा तुरुंगात जातो आणि तेथेच त्याची नन्या भाई (प्रवीण तरडे) याची भेट होते. त्याला आपल्या टोळीत सामील करून घेतो. पुढे हाच राहुल नन्या भाईचा खून करून त्याच्या टोळीचा बॉस बनतो. निरंकुश पद्धतीने वागणाऱ्या राहुल आणि छोट्या-मोठ्या गुंडांमध्ये भांडण लावण्याची शक्कल इन्स्पेक्टर कडू (उपेंद्र लिमये) लढवतात. या टोळीयुद्धाचा भडका उडाल्यामुळे नेमका शेवट काय होतो ? मुलं गुन्हेगारीकडे कशी ओढली जातात ? मुलगा गुन्हेगार झाल्यावर कुटुंबियांची काय स्थिती होते हे सगळं जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्की पहायला हवा.

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.कोट्यावधी रुपये असून देखील आपल्या कुटुंबाला सुखी ठेवू शकत नाही असा राहुल जेव्हा हॉटेलमध्ये एक सुखी कुटुंब पाहतो तेव्हाचा सिन अक्षरशः अंगावर येतो. या सिनेमातील संवाद अप्रतिम असून कुठेही गुंडाची लाइफस्टाइल दाखविण्याकरिता शिव्यांचा वापर केलेला दिसत नाही त्यामुळे तुम्ही सहकुटुंब हा सिनेमा पाहू शकता.

आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या या सिनेमातील भाईटम सॉंगने अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स चाहत्यांना दिसणार आहे. प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे.अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत.

याशिवाय ओम भूतकर आणि मालविका गायकवाड या फ्रेश जोडीवर ‘उन उन’ हे अतिशय सुंदर असे रोमँटिक गाणे चित्रित करण्यात आले आहे.वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजाचा साज चढलेल्या ‘उन उन’ गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी आहेत. तर नरेंद्र भिडे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. ‘उन उन व्हटातून गुलाबी धांदल, वाफाळल्या पीरमाची मोगरी मलमल’’ असे शब्द असलेल्या गाण्यातून चहाच्या वाफेसोबत दोघांच्याही मनातील प्रेमाला उकळी फुटलेली दिसते.

पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते एकत्र आल्यानंतर काय धमाल करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणून या सिनेमाकडे पाहता येईल अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचे अनंत नारायण आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, अनिरुद्ध दिंडोरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते, देवेंद्र सारळकर यांनी ‘नटवर्य केशवराव दाते पारितोषिक’ पटकावलेले आहे. शैलेश देशमुख यांना निर्मल पारितोषिक, स्नेहल तरडे यांना माई भिडे आणि अक्षय टंकसाळे यांना काकाजी जोगळेकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा व वास्तववादी स्थिती मांडणारा आहे. या चित्रपटाची गोष्ट भावनिक दृष्टया आपल्याशी जोडली जाते. पण ती सांगताना त्यात उत्तरार्धात आणखी काही प्रसंग असायला हवे होते असं वाटून जातं. पण इतर सर्व पातळ्यांवर हा चित्रपट यशस्वी ठरतो. काही वेळा हा सिनेमा पाहताना वास्तव, सत्या, लालबाग परळ यांसारख्या चित्रपटांची देखील आठवण होते. अनेक जण रस्त्यावर तलवारी घेऊन फिरतात पण त्यांना पोलीस थांबवत नाहीत या गोष्टी अतिशयोक्तीच्या वाटतात त्यामुळे चित्रपटाचा शेवट मात्र रुचत नाही.