fbpx

दोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र

सातारा : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजे म्हणजेच उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात पुन्हा एकदा मनोमिलन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे मनोमिलन होण्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील मुहूर्त ठरविण्यात आला आहे.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. त्यानंतर त्यांचे मनोमिलनही सर्वाना माहिती आहे. गेल्यावर्षी साताऱ्यातील नगर पालिका निवडणुकीत त्यांचे मनोमिलन फिस्कटले होते. त्यानंतर दोन्ही राजांत टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. हे मतभेद कायमास्वरुपीचे ठेवून चालणार नाहीत. कारण एकामेकांच्या आगामी वाटचालीत काट्याप्रमाणे हे मतभेद टोचू शकतात, हे या दोन्ही राजांनी ओळखून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघांचीही वाटचाल सुखरूप होण्यासाठी मनोमिलनाची तयारी सुरू आहे.

साताऱ्यामध्ये कार्यरत असलेल्या योध्दा प्रतिष्ठानने कोटेश्‍वर मैदानावर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. याच कार्यक्रमात दोघांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमास  उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे हे दोघेही उपस्थित राहणार आहेत, असा विश्‍वास संयोजन समितीने व्यक्त केला आहे.

कार्यक्रमास कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याने दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यांत मनोमिलन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.