fbpx

मोहम्मद अली जीना हे महापुरुषच; भाजपा खासदाराची मुक्ताफळे

नवी दिल्ली – अलीगढ मुस्लिम विद्यापीठात मोहम्मद अली जीना यांचा फोटो असायला हवा की, नको यावरून चांगलाच वाद पेटला आहे. एकीकडे मोहम्मद अली जीना हे भारत- पाकिस्तान फाळणीला कारणीभूत असून, त्याचा फोटो विद्यापीठात लावता कामा नये अशी भाजपची भूमिका आहे. मात्र दुसरीकडे भाजपच्याच खासदार असलेल्या साध्वी सावित्रीबाई फुले यांनी मोहम्मद अली जीना हे महापुरुषच होते म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

जीना हे महापुरुषच होते, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते, असे त्यांनी म्हटले आहे.जीना वादावार गुरुवारी भाजपा खासदार साध्वी सावित्रीबाई फुले यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, जीना हे महापुरुष होते आणि यापुढेही असतील. अशा महापुरुषाचे छायाचित्र आवश्यक असेल तिथे लावलेच पाहिजे. गरीबी आणि भूकबळीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच हा वाद निर्माण केला गेला, असा दावाही त्यांनी केला आहे.

खासदार सावित्रीबाई फुले यांनी यापूर्वीही पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. मी खासदार राहू अथवा न राहू, घटनेत बदल करू देणार नाही. केंद्राचे धोरण अनुसूचित जाती,जमातीच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.जीना वादात यापूर्वी योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी देखील जीना यांना महापुरुष म्हटले होते. राष्ट्र निर्माणात ज्या महापुरुषांचा समावेश होता, त्यांच्यावर कोणी टीका केली तर ती निंदनीय बाब आहे. फाळणीपूर्वी जीना यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिल्याचे मौर्य यांनी म्हटले होते.