औरंगाबाद शहरातील चार हजार वीज ग्राहकांचे मीटर जप्त

MSEB

औरंगाबाद: औरंगाबाद महावितरणने दहा हजार रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकीत असलेल्या चार हजार ग्राहकांचे मीटर जप्त केले असून त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहेत .औरंगाबाद शहरात रहिवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांची एकूण संख्या दोन लाख 68 हजार इतकी आहे. या वीज ग्राहकांमध्ये एक लाखांवर बिल असलेल्या ग्राहकांवर महावितरण कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर महावितरण कार्यालयाने दहा हजार रुपयांपेक्षा अधिक वीज बिल थकित वीज ग्राहकांकडून बिलाची वसुली करण्याची मोहीम सुरू केली आहे.

औरंगाबाद शहरात 17 हजार 789 वीज ग्राहकांकडे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक बिल बाकी आहे. त्यांच्याकडे सुमारे 95 कोटी सात लाख रुपये थकित आहेत. या वीज ग्राहकांकडून बिलाची वसुली करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. या कारवाईनंतर 4945 वीज ग्राहकांकडून दहा कोटी 78 लाख रुपये वसूल केले आहेत. या कारवाईत 930 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या वीज ग्राहकांकडे पाच कोटी 51 लाख रुपये वसुली बाकी आहे. याशिवाय दहा हजार रुपये बिल बाकी असूनही ते न भरणाऱ्या 4507 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आले आहे. या वीज ग्राहकांकडे 42 कोटी रुपयांची बिल थकित आहे.

दहा हजार रुपये थकीत असलेल्या दहा हजार थकबाकीदार वीज ग्राहकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत सात हजार वीज ग्राहकांवर येत्या काही दिवसांत कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणने सूचित केले.