विजयाचं श्रेय धोनीला – शार्दूल ठाकूर

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्ज सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करत आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचली आहे. सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जसमोर विजयासाठी अवघ १४० धावांचं आव्हान ठेवलं होत. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने संघ संकटात सापडला होता.

दरम्यान चेन्नईची आठ बाद 113 अशी घसरगुंडी उडाली. पण ड्यू प्लेसीसने एकाकेकी खिंड लढवून चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याला खऱ्या अर्थाने साथ दिली, ती शार्दूल ठाकूरने. नशिबानेही शार्दूलला साथ दिली आणि चेन्नईच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. शार्दूलने पाच चेंडूंमध्ये नाबाद 15 धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता.

शार्दूल ठाकूरने या खेळीचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं. ”ही एक चांगली संधी होती आणि संघासाठी धावा करण्याची गरज होती. जेणेकरुन फाफ डू प्लेसिसला साथ मिळेल. कारण, तो सेट झालेला होता. प्रशिक्षकांनीही सांगितलं होतं, की तू फलंदाजी करु शकतोस. पुण्याकडून खेळताना फलंदाजीची संधी आलेली असल्यामुळे अनुभव होताच. मैदानात उतरतानाच धोनीने सांगितलं, की चेंडू पाहा आणि मग मार. त्याप्रमाणेच केलं आणि आम्ही विजय मिळवला असं शार्दूल ठाकूर याने सांगितले.