‘हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर आता तरी मिस्टर इंडिया प्रकट होतील अशी अपेक्षा आहे’

अतुल भातखळकर

मुंबई  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. तर अनिल देशमुख प्रकरणात दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळावे या मागणीसाठी राज्य सरकारने केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली.  त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.

विशेष म्हणजे दोन आठवडे स्थगिती देण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. स्थगिती दिल्यास तपासात हस्तक्षेप केल्या सारखे होईल असे उच्च न्यायालयाने म्हणत याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती संदिप शिंदे आणि न्यायमुर्ती एन जे जामदार यांनी ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे हा अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला देखील मोठा झटका मानला जात आहे.

अनिल देखमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच आक्षेप घेतलेला असताना महाराष्ट्र सरकारने त्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या, तसेच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधल्या दोन परिच्छेदांमध्ये यासंदर्भातले उल्लेख करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळल्यामुळे राज्य सरकारसाठी देखील हा धक्का ठरला आहे.

दरम्यान, न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणाले,  बारमालकांकडून वसुली करणाऱ्या अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून हायकोर्टाने त्यांचे कायद्यापासून पळण्याचे मार्ग बंद केलेत. देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय. वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली आहेत. मुंबई हायकोर्टाने देशमुख यांनी केलेली याचिका फेटाळली आहे. मिस्टर इंडिया आता तरी प्रकट होतील अशी अपेक्षा आहे. असा भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP