fbpx

एमपीएससी पूर्व परीक्षा : ‘मास-कॉपी’च्या ‘या’ पत्रामुळे सोशल मिडीयावर खळबळ

टीम महाराष्ट्र देशा – १७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा ही होऊ घातली आहे. अतिशय महत्वाच्या अशा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्यातील लाखो परीक्षार्थी सज्ज झाले आहेत. मात्र सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका पत्रामुळे विद्यार्थी मात्र कमालीचे काळजीत पडलेले पहावयास मिळत आहेत.

प्रवेश पत्रानुसार दिलेल्या परीक्षा बैठक क्रमांकाचे अवलोकन केले असता, सदर बैठक क्रमांक हे उमेदवारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकच्या आधारे देण्यात आल्याचे लक्षात येते, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.

या पत्रात उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ करिता अर्ज करण्यापूर्वी जाणिवपूर्वक एका पाठोपाठ येणारे भ्रमणध्वनी क्रमांक खरेदी केले व तेच भ्रमणध्वनी क्रमांक आपल्या प्रोफाईल मध्ये अद्यावत केल्याचा दावा करण्यात आला असून या परीक्षेत मास-कॉपी’ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र देशा या पत्राची कुठल्याही प्रकारे हमी घेत नसून हे पत्र नेमेके कोणी लिहिलेले आहे, याची नेमकी माहिती देखील उपलब्ध होऊ शकली नाही. हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झालेले आहे. याबाबत आम्ही एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली असता तिथे या संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेले पत्र जसेच्या तसे,

प्रती,
मा. सचिव ,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,
मुबई.

विषय :- राज्यसेवा २०१९ अनुषंगाने झालेला परीक्षा बैठक व्यवस्थे बाबत…

महोदय,
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करतो कि, येत्या १७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ ही परीक्षा होऊ घातलेली असून आपल्या द्वारे नुकतेच उमेदवारांना परीक्षा प्रवेशप्रत्र अदा करण्यात आले आहे. सदरील प्रवेश पत्रानुसार दिलेल्या परीक्षा बैठक क्रमांकाचे अवलोकन केले असता, सदर बैठक क्रमांक हे उमेदवारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकच्या आधारे देण्यात आल्याचे लक्षात येते. भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे परीक्षा बैठक क्रमांक देण्याची पद्धत मा. आयोगा द्वारे २०१७-२०१८ सालात घेण्यात आलेल्या बऱ्याच परीक्षांच्या करिता अवलंबवण्यात आली होती, असेही लक्षात येते.

सदर बाबीचा गैरफायदा करून घेण्यासाठी बऱ्याच उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ करिता अर्ज करण्यापूर्वी जाणिवपूर्वक एका पाठोपाठ येणारे भ्रमणध्वनी क्रमांक खरेदी केले व तेच भ्रमणध्वनी क्रमांक आपल्या प्रोफाईल मध्ये अद्यावत केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर वस्तुस्थिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगास भ्रमनध्वनी बद्दलण्या बाबत प्राप्त झालेल्या ई-मेल संदेशावरून लक्षात येऊ शकेल. त्या मुळे मोठ्या प्रमाणत अश्या समुहाने अभ्यास करणाऱ्या (विशेषता खाजगी क्लास च्या उमेदवारांचे) बैठक क्रमांक हे आयोगाच्या प्रचलित बैठक व्यवस्था पद्धती नुसार एकमेकांच्या मागे-पुढे आले आहेत. त्या मुळे सदर विद्यार्थी वर नमूद परीक्षेच्या वेळी “समुहाने कॉपी” करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणत बसू शकतो. आयोगाच्या परीक्षांसाठी असलेली जीव घेणी स्पर्धा लक्षात घेता, ७-८ प्रश्नांची देवघेव झाल्यास विशेषता C-SAT च्या पेपर मध्ये त्याचा परिणाम अंतिम गुणवत्ता यादी वर होण्याची दाट शक्यता आहे. जरी प्रश्न पत्रिकांचे वेगवेगळे चार संच असले तरी, उताऱ्यावरील प्रश्नांचा क्रम व पर्याय बदलत नसल्याने उत्तरांची देवघेव करणे त्या मानाने सोपे आहे, ही बाब मा. आयोगाने लक्षात घ्यावी.

मागील काही वर्षात आयोगाने केलेल्या विविध सुधारणा व उपाययोजनांमुळे, आयोगाने घेतलेल्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. त्यामुळे जर “मास-कॉपी” (समुहाने कॉपी) सारख्या घटना घडल्या तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होवू शकतील. तरी सदर बाब टाळण्या साठी दि. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने तात्काळ पावले उचलून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होतील या बाबत योग्य ती कार्यवाही करावी.

तरी सदर बैठक व्यवस्थेमुळे होणारे गैर प्रकार टाळण्याकरिता आयोगाने बैठक व्यवस्था निश्चित करण्यासाठी इतर पर्यायी निकषांचा (उदा. आधार क्रमाक, जन्म दिनांक इ.) वापर करावा, ही नम्र विंनती.

आपला विश्वासू
…………………………………………..

सर्वांनी
वरील संदेश आयोगाला mail करावा
👇
[email protected]

[email protected]