राजकारण आणि सिनेमातील ‘खिलाडी’ एकमेकांना भेटतात तेव्हा …

udayanraje akshay-

टीम महाराष्ट्र देशा- साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारची ‘केसरी’च्या सेटवर जाऊन गळाभेट घेतली. आज दुपारी पिंपोडे बु॥ ता. कोरेगाव येथे असलेल्या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी यांच्या भेटीच्या अद्भुत योगामुळे सर्वांनाच सुखद धक्का दिला.

सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात केसरी या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी मुक्कामाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पिंपोडे बु॥ परिसरात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने पिंपोडे बु॥ परिसराचा आज दौरा सुरु असताना उदयनराजे थेट सेटवर जाऊन पोहचले. उदयनराजेंच्या धडाकेबाज एन्ट्री नंतर चित्रपटाच्या सेटवर एकच खळबळ उडाली. उदयनराजे सेट वर आल्याचं समजताच अक्षय कुमार स्वतः स्वागतासाठी गेला आणि दोघांनी गळाभेट घेतली.

दिलखुलास उदयनराजेंनी अक्षय कुमारला आपल्या जलमंदिर पॅलेस येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण अक्षय कुमारने मोठ्या आनंदाने स्विकारले असल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय कुमारचा केसरी सिनेमा 22 मार्च 2019 ला रिलीज होणार आहे.