रोहित माझा चांगला मित्र पण राजकारण आणि मैत्री वेगळी – सुजय विखे

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगरचे नवनिर्वाचित खा सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्याबद्दल केलेलं विधान सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र सुजय विखे यांनी स्वतः आपण असे कोणतेही विधान केले नसल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच रोहित हा माझा चांगला मित्र आहे, मात्र राजकारण आणि मैत्री वेगळी असल्याचं म्हंटले आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुजय विखे यांनी कर्जत जामखेडमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये पवार घराण्यातील कोणत्याही व्यक्ती विरोधात एक शब्दही बोललो नसल्याचे सांगितले आहे. रोहित पवार यांच्याशी चांगले सबंध असून आपण राजकारण आणि मैत्री कधीही एकत्र करणार नसल्याचं म्हंटले आहे.

दरम्यान, रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून विधानसभा लढवणार का, हे माहित नाही. मात्र आपण भाजप खासदार म्हणून पक्षाचा प्रचार प्रामाणिकपणे करणार असल्याचे सुजय यांनी सांगितले आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेले सुजय यांचे ‘ते’ विधान

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कर्जत येथे सुजय विखे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडची चिंता सोडावी, कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू. असे वक्तव्य सुजय विखे यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.