ही तर गुरुवर्य दिघे साहेबांचीच प्रेरणा- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

अल्लेपी/केरळ – केरळ राज्यात निर्माण झालेल्या महापुराच्या प्रलयकारी संकटाने संबंध हिंदुस्थानच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आपल्यापरीने प्रत्येक जण खारीचा वाटा उचलून केरळला मदत करत आहे. केरळात सेनेचे अजिबात अस्तित्व नसले तरी माणुसकी ह्या आमच्या गुरुमंत्रासाठी आम्ही आज इथे आहोत. ही गुरुवर्य दिघे साहेबांचीच प्रेरणा आणि त्यांचेच बळ असे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर आदी सेनेचे पदाधिकारी केरळात डॉक्टरांच्या पथकासाहित उपस्थित आहेत.तसेच ठाणे जिल्हा शाखेकडून ५० टन सामान देखील अल्लेपी या सर्वाधिक बाधित जिल्ह्यात वाटले जाणार आहे. त्यावेळी खासदार डॉ. शिंदे बोलत होते.

आज दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख व ठाण्यातील जनमानसांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आनंद दिघे यांची पुण्यतिथी. आजच्या दिवशी सन २००१ मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. सर्वसामान्य लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, सेनेची शाखा हेच घर मानणारे, सर्वांचे आदराचे स्थान म्हणून आनंद दिघेनची ओळख आहे. जनतेने अफाट प्रेम केलेला नेता ही त्यांची ओळख आजही तशीच आहे. त्यांच्याच मुशीत तयार झालेले पालकमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांचा हा वारसा पुढे नेत आहेत.

‘ गुरुवर्य दिघे साहेबांनी दाखवलेला समाजसेवेचा मार्ग हाच आमचा मार्ग असून सेना त्या रस्त्यावरून कायम मार्गक्रमण करत राहू’,असेही खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ‘आमची बांधिलकी जनतेशी असून माणुसकी जपणं हा आमचा मंत्र आहे, असे म्हणत ही केरळातील मदत दिघे साहेबांना खरी श्रद्धांजली आहे, साहेब आमच्यासोबत कायम आहेत आणि नेहमी मार्ग दाखवत राहतील’ असे देखील ते म्हणाले.

एकंदरीत, ठाणे जिल्हा सेनेने दिघेसाहेबांना दिलेली ही खरी-खुरी श्रद्धांजली आहे, अशी चर्चा ठाण्यातील जनसामन्यात सध्या चालू आहे.

खा. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामातून कल्याणचा सुभा झाला चिरेबंदी