अजितदादा पवारांची, तर मी मराठ्याची अवलाद आहे : खा. आढळराव पाटील

'संपूर्ण पवार खानदान मला हरवू शकत नाही'

नवी दिल्ली : शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून बोलत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण पवारांची औलाद असून साहेबांनी आदेश दिल्यास शिरूरमध्ये लढून जिंकूदेखील असा विश्वास रविवारी व्यक्त केला होता, त्यानंतर आता शिरूरचे विद्यमान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा पवारांची, तर मी मराठ्याची अवलाद आहे. संपूर्ण पवार खानदान मला हरवू शकत नसल्याची घणाघाती टीका एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

पवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला; तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची माझी तयारी आहे. मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. एका बाजूला शिरूरमध्ये लढण्यासाठी पक्षाला उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असताना दस्तुरखुद्द अजित दादांनीच स्वत: लढण्याची तयारी दाखवल्याने कार्यकर्त्यांना देखील बळ आले आहे.

दुसरीकडे, आपल्याला कोणाही लिंबूटिंबू विरोधात लढायचं नाही. मागील १५ वर्षापासून मी लढण्यासाठी पवारांचीच वाट पाहत आहे, आता अजित पवारांनी माझ्या विरोधात लढण्याचा शब्द फिरवू नये. तसेच ते संपूर्ण पवार खानदान मला हरवू शकत नाही, असा टोला खा. आढळराव पाटील यांनी लगावला आहे.

You might also like
Comments
Loading...