ब्रेकिंग : भाजप सहयोगी खासदार संजय काकडे अजित पवारांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : पुण्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.संजय काकडे सध्या भाजपचे राज्यसभा खासदार असून काकडे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, मात्र दुसरीकडे भाजप नेतृत्वाकडून नवीनच खेळी खेळण्यात आल्याचं दिसत असून. पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमधून दोन तरुण चेहरे समोर आले आहेत. यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि वडगाव शेरीचे आ. जगदीश मुळीक यांचा समावेश आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले काकडे थेट अजित पवारांच्या भेटीला पोहचले आहेत.

२०१४ प्रमाणे आगामी निवडणुकीत देखील पुणे लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे क्लस्टरच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या बैठकीनंतर आता भाजपचा नवीन सर्व्हे समोर आला असून यामध्ये संजय काकडे आणि गिरीश बापट यांची नावे मागे पडली आहेत. तर युवा चेहरे असणारे मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक हे उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेत अजित पवारांच्या अस्तित्वाला धक्का दिल्यानंतर संजय काकडे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होत. मात्र आता लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेंना पेव फुटला आहे.