fbpx

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली अमित शहांची भेट, माढ्याच्या प्रश्नांवर चर्चा

टीम महाराष्ट्र देशा:राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचे राष्टीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शहा यांच्या भेटी दरम्यान राज्यामध्ये गाजत असलेल्या नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित प्रश्नावर चर्चा झाल्याचं खा नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाच्या ऑफिसमध्ये मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करत निवेदन दिले आहे. यावेळी माढा मतदारसंघातील नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित कामे तसेच फलटण बारामती व फलटण पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

शहा यांनी माढा मतदारसंघातील विविध कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल आहे. मतदारसंघातील दुष्काळी तालुक्यांचा दुष्काळ कायम स्वरुपी पुसण्यासाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही अमित शहा यांनी दिल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.