कोरोनासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची खासदार राहुल गांधी यांची मागणी

नवी दिल्ली : काँग्रस नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी ऑनलाईन पत्रकार परिषदे घेत केंद्र सरकारला धारेवर धरले. कोरोनाची तिसरी लाट येणारच आहे, अशा परिस्थितीत सरकारने आतापासूनच तयारी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. इतकेच नाही तर कोरोना संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आणि झालेल्या चुका दुरुस्त करण्याची मागणीही राहुल यांनी केली. सरकारला योग्य मार्ग दाखवण्यासाठीच आपण श्वेतपत्रिकेची मागणी करत असल्याचे ते म्हणाले.

देशातील संशोधकांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यासंदर्भात सरकारला इशारा दिला होता. मात्र, याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप राहुल यांनी केला. दुसऱ्या लाटेत सरकार अपयशी ठरले. दुसऱ्या लाटेत ज्यांना वाचवता आले असते, त्यांना वाचवता आले नाही. दुसऱ्या लाटेतील मृत्यूपैकी ९० टक्के मृत्यू हे सुविधा नसल्यामुळे झाले आहेत. सरकारच्या दुर्लक्षामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला, तर कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. देशात सर्वच ठिकाणी बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने उपाय केले नाही. आता देशात तिसरी आणि नंतर चौथी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने आधीच सर्व तयारी करायला हवी, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या वतीने श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात येत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. यामध्ये तिसऱ्या लाटेची तयारी, दुसऱ्या लाटेमधील त्रुटी, आर्थिक स्वरुपातील मदत आणि नुकसान भरपाईची व्यवस्था यांचा उल्लेख करण्याची मागणी राहुल यांनी केली आहे. ज्यांच्या घरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाले त्यांना आर्थिक मदत मिळायला हवी, असेही राहुल म्हणाले. या दरम्यान राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. देशात दुसरी लाट असताना पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त होते, असेही ते म्हणाले.

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की, लसीकरणात भाजप आणि काँग्रेस असे विभाजन करु नका, तर प्रत्येक राज्याला लस मिळाल्या पाहिजे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले त्या वेळी सरकाच्या मंत्र्यांनी ज्यांची खिल्ली उडवली. मात्र, नंतर सरकारला तेच उपाय करावे लागले. आमच्या वतीने करण्यात आलेली श्वेतपत्रिकेची मागणी मान्य झाली तर, त्याचा फायदा सरकारला होईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या