अमरावतीमधील अत्याचार प्रकरणावर खासदार नवनीत राणा मुग गिळून गप्प

navneet rana

अमरावती : गेल्या तीन दिवसांत अत्याचारांच्या चार घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. मुंबईतील साकीनाका इथल्या बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे पिंपरी चिंचवड, अमरावती आणि वसईतही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात दोन बलात्काराच्या घटना घडूनही जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणावर एक चकार शब्दही काढला नाही. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या ट्विटरवर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दिल्ली येथे केंद्रिय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांची भेट घेवून जिल्ह्यातील विद्युत व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी १८९ कोटींचा निधी मंजूर केल्याचे ट्विट केले आहे. यासोबतच हरितालिका, पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र स्वत:च्या मतदार संघातील या अत्याचाराच्या घटनेबाबत त्यांनी ब्र देखील काढला नाही. खासदार आणि महिला लोकप्रतिनिधी असल्याच्या नात्याने त्यांनी या घटनेतील पिडीतेला भेटण्याची तसदीदेखील घेतली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर रोष व्यक्त होताना दिसत आहे.

काय आहेत घटना?
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाणे हद्दीत एका ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील एका वीस वर्षीय नराधमाने गवत कापायला जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून शेतात नेले व तिच्यासोबत अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन या नराधमाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तर, ११ सप्टेंबर रोजीही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून ती गर्भवती राहील्याने बदनामीच्या भीतीपोटी तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले असून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

महत्वाच्या बातम्या