नागरिकांच्या भेटीसाठी नेत्यांची मॉर्निंग वॉकला पसंती, खा.कपिल पाटलांनी साधला कल्याणकरांशी संवाद

blank

टीम महाराष्ट्र देशा- भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांनी आपल्या प्रचारार्थ थेट कल्याणमधील काळा तलाव येथे आमदार नरेंद्र पवार यांच्यासमवेत मॉर्निंग वॉक केला. काळा तलाव परिसरात महिला, युवक व जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळी मोकळ्या हवेत फिरण्यासाठी येत असतात. दरम्यान या ठिकाणी येत कल्याणच्या विकासासाठी नागरिकांना भेटून त्यांच्या संकल्पना, सूचना जाणून घेण्यासाठी त्यांनी हा मॉर्निंग वॉक पर्याय अवलंबला आहे. आपल्या मागील पाच वर्षाचा आढावा देत येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येक नागरिकाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

मतदारसंघात बूथ, वार्डनुसार घरोघरी संपर्क, बैठका, सभा सुरु असतानाच थेट काळा तलावावर मॉर्निंग वॉकला जात नागरिकांना भेटल्यामुळे आनंद व्यक्त होत होता.

कल्याणमध्ये दुर्गाडी ब्रिज, पत्रीपूल आणि शहाड ब्रिजमुळे नागरिकांना वाहतुकीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे मात्र ही अडचण तातडीने मुक्तता करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. स्मार्ट सिटी, रेल्वे, मेट्रो ट्रेन आदी अनेक कल्याणचा चेहरामोहरा बदलणारी कामे सुरु आहेत. ती कामे जेव्हा पूर्ण होतील तेव्हा कल्याण हे एक उत्कृष्ट शहर म्हणून गणले जाईल असेही खासदार कपिल पाटील यांनी बोलताना सांगितले.दरम्यान मार्निंग वॉक झाल्यांनतर थेट टपरीवर चहाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांसह गप्पांची मैफल कल्याणकरांना पाहायला मिळाली.

यावेळी नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेविका वैशाली पाटील, भाजयुमो अध्यक्ष भगवान म्हात्रे, नितीन चौधरी, रवि गायकर, डॉ. चंद्रशेखर तांबडे, प्रताप टूमकर, रवि गुप्ता, सतीश बोबडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.