….आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठाणे मॅरेथॉन विजेते ठरले…!

ठाणे/प्राजक्त झावरे-पाटील – क्रीडा क्षेत्रात सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी २९ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन अनेक नामवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागात काल संपन्न झाली. जवळपास २० हजार स्पर्धक यात सहभाग झाले. या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांनी प्लास्टिकमुक्तीच्या संदेशासोबतच अवयदानाबाबतही जनजागृती केली.

गेली २८ वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंचे आकर्षण ठरली आहे. २८ वर्षे सातत्याने वर्षा मॅरेथॉन आयोजित करणारी ठाणे महापालिका भारतातील एकमेव महापालिका आहे. या मॅरेथॉनमध्ये २१ किमी पुरुष गट आणि १५ किमी महिला गट व १० किमी १८ वर्षांवरील मुले (खुला गट) या तीन मुख्य गटांतील स्पर्धासोबत शालेय विद्यार्थी स्पर्धा तसेच २ किमीची RUN FOR Environment या स्पर्धा पार पडल्या. परंतु या स्पर्धांसोबत एक अनोखी मॅरेथॉन काल पार पडली ती म्हणजे लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी यांच्यातील दौड..

पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अचानक ही स्पर्धा जाहीर केली. आणि मग काय स्टेज वरील सर्वच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मैदानात आले. खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, उपायुक्त संदीप माळवी, शिक्षण सभापती विकास रेपाळे आदी विविध पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी यात सामील झाले.

या स्पर्धेच फिटनेस चॅलेंज स्वीकारून मैदानात उतरलेल्या पदाधिकारी यांनी काही मिनिटात ही स्पर्धा पूर्ण देखील केली. या अनोख्या मरेथॉनचे विजेते ठरले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तर आमदार रवींद्र फाटक दुसऱ्या स्थानावर राहिले. एकंदरीत ही स्पर्धा सुद्धा जिंकल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या क्षेत्रात सुद्धा आघाडीवरच असल्याची चर्चा मात्र मॅरेथॉन मध्ये रंगली.