मध्य प्रदेशात कमलनाथांचा ‘राज ठाकरे पॅटर्न’

टीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. शपथविधीच्या काही तासांमध्येच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणाऱ्या कमलनाथ यांनी राज्यातील नौकऱ्यांमध्ये सर्वप्रथम स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्यावर कमलनाथ यांनी मोहोर उमटवल्याचं बोललं जातं आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक राज्यात येतात त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो आणि स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे स्थानिकांना 70 टक्के जागा दिल्यानंतरच गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना लागू होईल, यासंबंधी एका फाईलवर सही केल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली आहे.

राज्यामध्ये येणाऱ्या उत्तर भारतीयांच्या लोंढ्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे सर्व सरकारी आणि खासगी नौकऱ्यांत प्रथम स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी राज ठाकरेंकडून कायम करण्यात येते. अशावेळी उत्तर भारतीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा नियमच केल्याने राज ठाकरेंची मागणी रास्तच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.