सरकाररुपी अफजलखानाचा कोथळा काढायला तयार राहा – अमोल कोल्हे 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या चौथा टप्पाचा समारोप महाड येथील जाहीर सभेत करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. सरकाररुपी अफजलखानाचा कोथळा काढायचा आहे त्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठाम उभे रहा असे जाहीर आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाडच्या जाहीर सभेत केले आहे.

दरम्यान, मावळयांनी गडकिल्ल्यांवर आपल्या प्राणांची आहुती दिली त्या छत्रपतींच्या किल्ल्यावर लग्नसमारंभ केले जाणार आहे. यावर आवाज उठवल्यानंतर सरकार नमले मात्र निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली तरीसुद्धा सरकारने घेतलेला निर्णय रद्द केलेला नाही हे लक्षात ठेवा असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी केले.

तर, यावेळी सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेत फूट पाडण्याचे काम गेली पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विकासाचे काम केले असते तर आज फडणवीसांवर यात्रा काढण्याची वेळ आली नसती.

जयंत पाटील यांनी कोकणातील मूलभूत प्रश्नांवर सुद्धा भाष्य केले. आज मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रचंड विरोध होत असताना कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मुख्यमंत्री पोलिसांचा चुकीचा वापर करत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत हेरगिरी करण्यासाठी पोलीस पाठवले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

आज अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत. मात्र ८० वर्षांचा तरुण आजही झटतोय. महाराष्ट्रभर तरुणांचा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. देश आर्थिक डबघाईला निघाला आहे सरकारने याआधीही रिझर्व्ह बँकेतून पैसे काढले आहे. केवळ या सरकारने डल्ला मारण्याचे काम केले आहे. अशा डल्लामार लोकांना आता धडा शिकवणे गरजेचे आहे, अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करून जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले.

महत्वाच्या बातम्या