कर्नाटकात सत्ता बदलाच्या हालचाली, लोकसभेचा निकाल लागताच भाजप करणार सत्तास्ट्राईक 

amit shaha narendra modi

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे, तर 23 मेला निकाल लागणार आहे. 2014 प्रमाणे भाजपला दणदणीत विजय मिळणार नाही, असा विश्वास विरोधीपक्ष व्यक्त करत आहेत. तर भाजप नेते मात्र अबकी बार 300 पारचा नारा देत आहेत. दरम्यान केंद्राप्रमाणे काही राज्यांमध्ये देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

कर्नाटकमधील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्षातील नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये काँग्रेसच्या पाच ते सहा आमदारांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी आपली असल्याचं काँग्रेसमधील नाराज आ. रमेश जारकीहोळी यांनी भाजप नेत्यांना कळवले आहे. तसेच इतर आमदारांसाठी भाजपने प्रयत्न करावे असंही त्यांनी सांगितले आहे.

जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्यासह सहा आमदार राजीनामा देतील. असं सांगितले आहे. असे झाल्यास भाजपला सत्ता स्थापनेसाठी मार्ग सुकर होणार आहे. एकंदरीत चित्र पाहता लोकसभेचा निकाल लागताच भाजप कर्नाटकात सत्तास्ट्राईक करणार असल्याचे दिसत आहे.