ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजप पक्ष आज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यानूसार आज विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, नागपुरात आंदोलन करणारे बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात बावनकुळे आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नागपूरातील रहदारीच्या ठिकाणी मानेवाडा चौकातील वाहतूक साधारण अर्धा तास रोखून धरण्यात आली होती.कोणतीही पूर्वसूचना आणि परवानगी न घेता केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनी बळजबरी करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, ही संतापाची बाब आहे. ओबीसीला आरक्षण मिळू नये यासाठी सरकारमधीलच झारीतले शुक्राचार्य जबाबादर आहेत. विधी व न्याय विभागाने न्यायालयात बाजू योग्य पद्धतीने मांडली असती तर ही वेळ आली नसती. इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. कमीत कमी सहा जिल्ह्यांचा डाटा जरी एकत्र केला असता तर तिथे आरक्षण देता आले असते. पण राज्य शासनाने काहीच केले नाही. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर दबावापोटी मुख्य सचिवांनी एकही बैठक घेतली नाही. मात्र, ओबीसींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या