Motorola- मोटोरोलाचे दोन स्मार्टफोन भारतात दाखल

मोटोरोला कंपनीने भारतात ई ४ आणि मोटो ई ४ प्लस हे दोन स्मार्टफोन अनुक्रमे ८,९९९ आणि ९,९९९ रूपये रुपयात लाँच केले आहेत.

हे दोन्ही मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले. मोटो ई ४ या मॉडेलमध्ये मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर असून या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस आणि एनएफसी फिचर्स देण्यात आले आहेत. यात पाच इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १२८० अर्थात एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. हा ड्युअल सीमकार्डची सुविधा असणारा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यात २८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.

मोटो ई ४ प्लस याची खासियत म्हणजे यातील तब्बल ५,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असेल. यात रॅपीड चार्जरची सुविधादेखील असेल. यात मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले असून फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क तसेच ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, मायक्रो-युएसबी आदींचा समावेश असेल.

मोटो ई ४ प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ ग्लास वक्राकार डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसर असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे.