fbpx

आरोग्यम धनसंपदा ! – बहूपयोगी उसाचा रस

टीम महाराष्ट्र देशा :  उन्हाळयाची चाहूल लागताच चौकाचौकात रसवंती गृहांची घुंगरे वाजू लागतात. नेमका हा काळही लग्नसराईचा असल्यामुळे लोक खरेदीसाठी दुपारच्या वेळेला  बाहेर पडत असतात.  आणि मग खरेदीनंतर हुश्श म्हणून थंडगार रस प्यायला पावले आपोआप रसवंतीकडे वळतात.

किंचित आंबट लिंबाची चव, अलगद तिखट आल्याची चव आणि भरपूर उसाची गोडी असा हा अप्रतिम संयोग असतो ; ज्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते आणि त्यासाठीच लहान -थोर सगळ्यांनाच हा रस प्यायला खूप आवडतो. आयुर्वेदाने उसाला एक प्रकारचं  गवत मानलं  आहे. पूर्वीपासून भारतात उसाचे गुण, त्यापासून रस काढणे आणि मग गुळ किवा साखर तयार करणे हे सगळं  माहित होतं. त्यामुळे ग्रंथांमधून उसाचे गुणही दिलेले आढळतात.

रक्त आणि पित्त यांना रस नियंत्रणात ठेवतो, त्यामुळे नाकातून रक्त येत असल्यास उसाचा रस उपयोगी आहे. तो रक्तशुद्धी करणारा आहे. त्यामुळेच काविळीच्या रुग्णांना उसाचा रस पिण्यास सांगितले जाते. उसाचा रस थंड गुणाचा असल्याने उन्हाच्यावेळी पिणे हितकारक आहे.

उसाचे उपयोग
१. उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
२. उन्हाळ्यात डीहायड्रेशन पासून बचाव होतो.
३. उसाचा रस खोकला, दमा आणि किडनीशी संबंधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे.
४. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे.
५. उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्वाचे आहे.

अशाप्रकारे उसाचे एक ना अनेक असे खूप सारे उपयोग आहेत. त्यामुळे याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग हा करायलाचं हवा.