लॉकडाऊन काळात बीडमध्ये सर्वाधिक सायबर गुन्हे

cyber-crime

मुंबई : देशभरात लॉकडाऊन असल्याने सगळे जण घरीच आहेत. या काळात मनोरंजनासाठी सर्वाधिक मोबाईलचा वापर प्रत्येक जण करत असतो. त्या सोशल मीडियाचा तर तुफान वापे होत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होत आहे. लॉकडाऊन काळात राज्यात २१८ गुन्हे नोंद झाले तर ४५ आरोपींना अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे.

फेसबुक, व्हाट्सऍप, टिकटॉक अशा अनेक सोशल मीडिया साईट्सवरून आक्षेपार्ह मजकूर, व्हिडीओ शेअर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बीडमध्ये सर्वाधिक २६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, त्या पाठोपाठ कोल्हापूर व पुणे ग्रामीण प्रत्येकी १५, जळगाव १३, मुंबई १२, सांगली १०, जालना व नाशिक ग्रामीण प्रत्येकी ९, सातारा ८, नांदेड, परभणी व नाशिक शहर प्रत्येकी ७, ठाणे शहर ६, नागपूर शहर, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, सोलापूर ग्रामीण प्रत्येकी ५, बुलढाणा, पुणे शहर, लातूर, गोंदिया प्रत्येकी ४, सोलापूर शहर ३, रायगड व उस्मानाबाद प्रत्येकी २, ठाणे ग्रामीण व धुळे प्रत्येकी १ अशी आकडेवारी आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

हा काळ कसोटीचा आहे. या काळात आपल्याला आलेली बातमी खरी आहे की खोटी आहे याची शहानिशा करूनच आपण ती पुढे पाठवायला हवी. तसेच कोणाही व्यक्ती, समाज, संस्था यांच्याविषयी तेढ निर्माण होईल, असा मजकूर टाकू नये, असे आवाहन पोलीस प्रशासन वारंवार करत आहे.