Honda- होंडा क्लिक स्कूटर दाखल

होंडा कंपनीने भारतीय बाजारपेठेत क्लिक ही स्कूटर लाँच केली असून या मॉडेलचे एक्स-शोरूम मुल्य ४२,९९९ रूपये इतके असेल.

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) कंपनीने बाजारपेठेत क्लिक हे नवीन मॉडेल उपलब्ध केले आहे. ही ११० सीसी क्षमतेची स्कूटर अत्यंत किफायतशीर दरात सादर करण्यात आल्याची बाब विशेष मानली जात आहे. ग्रामीण बाजारपेठेला डोळ्यासमोर ठेवून ही स्कूटर तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यात मागच्या बाजूस लगेज कॅरीयर देण्यात आले आहे.

तसेच यातील ट्युबलेस टायर्स हे उत्तम दर्जाचे असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. रेड विथ व्हाईट, ब्ल्यू विथ व्हाईट, ग्रे आणि ब्लॅक या चार आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना हे स्कूटर उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या सीटखाली युएसबी चार्जींगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यात इलेक्ट्रीक स्टार्टची व्यवस्थाही आहे. या मॉडेलमध्ये काँबी ब्रेक सिस्टीम देण्यात आली असून याच्या मदतीने पुढील आणि मागच्या चाकांचे ब्रेक एकाच वेळी लागून वाहन तात्काळ थांबते. अर्जंट ब्रेक लावण्याच्या अवस्थेत ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते.