राज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकार: सचिन सावंत

sachin savant and devendra fadnvis helicopter

मुंबई – राज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकार असून या सरकारला जमिनीवरच्या कटू वास्तवाची जाणिव नाही अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हवाई प्रवासाकरिता प्रतिवर्षी सहा कोटीं रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च झाल्याचे माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. यासदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड खालावलेली आहे, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. कर्जमाफीची प्रक्रिया एके ठिकाणी थांबवली जाते, बोंडअळी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतक-यांना सरकारने जाहीर केलेली मदतही मिळत नाही. तुरीच्या खरेदीसाठी कर्ज काढावे लागते.

दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर लावलेला दुष्काळाचा अधिभार दुष्काळ संपून दोन वर्ष झाली तरी वसुल करणे सुरुच आहे. हायवेवरील दारूची दुकाने बंद झाल्यामुळे इंधनावर लावलेला अधिभार दुकाने पुन्हा सुरु झाली तरी वसुल केला जात आहे. सातवा वेतन आयोग अद्याप जाहीर केला जात नाही. अशी परिस्थिती असतानाही स्वतः मुख्यमंत्र्यांकडून अशी उधळपट्टी होत असेल तर ते दुर्देवाचे आहे. या अगोदरही मंत्रालयातल्या चहा पानावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार संवेदनशील नसून बेजबाबदार आहे हे स्पष्ट झाले आहे.

करोडों रुपयांचा हवाई प्रवास करून राज्याला गतिमान प्रशासन मिळेल अशी किमान अपेक्षा होती. परंतु याउलट मुख्यमंत्र्यांच्या हवेतील प्रवासामुळे त्यांना जमिनीवरची वास्तविकता आणि महाराष्ट्राची दिवसेंदिवस दुर्धर होत चाललेली परिस्थिती दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या परिक्षांच्या निकालाचा घोळ, विद्यापीठांची दुरावस्था, प्रत्येक विभाग आणि मंत्र्यांचा भ्रष्टाचार, कर्जमाफी प्रक्रियेचा उडालेला बोजवारा यातून या सरकारचा सुमार कारभार दिसून येत आहे.

राज्यात 13 हजारांहून अधिक झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी, विविध क्षेत्रात महाराष्ट्राची होत असलेली पीछेहाट व कायदा सुव्यवस्थेची उडालेली धुळधाण याकरिता या सरकारची बेफिकिर वृत्तीच जबाबदार आहे. अतिरंजीत आकडे, मोठमोठे इव्हेंट व जाहिरातबाजीवरील कोट्यवधींची उधळपट्टी याने जनतेची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न जरी असला तरी आगामी निवडणुकांमध्ये जनताच या हवाहवाई सरकारला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा टोला सावंत यांनी लगावला.