fbpx

गुडन्यूज : मान्सून तीन दिवसांत महाराष्ट्रात होणार दाखल

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या आतुरतेने मान्सूनची वाट पाहात आहेत. दरवेळी ७ जूनला महाराष्ट्रात प्रवेश करणारा मान्सून यावेळी वेगवेगळ्या कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. मात्र आता परिस्थिती बदलली असून येत्या शुक्रवारी, २१ जून रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सोमवारी सांगितले.

सामान्य स्थितीत मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. यंदा तो विलंबाने दाखल झाला शिवाय त्याची पुढची वाटचालही चक्रीवादळामुळे मंदावली. एव्हाना देशाच्या मध्यापर्यंत मान्सून पसरतो. पण यंदा तो दक्षिणेतच रेंगाळला आहे. वायू चक्रीवादळाचा जोर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ओसरल्याने आता मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिणामी येत्या २० ते २१ जूनपर्यंत मान्सून कोकणमार्गे राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.