मोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा ?

टीम महाराष्ट्र देशा : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांना पक्षपातळीवर उमेदवारीसाठी विचारणा होत आहे.जरी पक्षपातळीवर विचारविनिमय सुरु असला तरी लोकसभेसाठी मात्र आमदार राजळे इच्छुक नाहीत.

लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीचे वारे वाहायला सुरवात झाली आहे. निवडनुकीच्या रिंगणात उमेदवार उतरल्यास तो जास्तीत जास्त मताने निवडून आला पाहिजे या एकाच निकषावर येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरतील,अशी तयारी सर्वच पक्षाकडून होत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे.मात्र शिवसेना-भाजपा युती होण्याबाबत गुप्त चर्चा शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये होत असल्याचे बोलले जात आहे.मात्र उघडपणे कुठलीही चर्चा अजूनपर्यंत झाली नाही.त्यामुळे अजूनतरी युतीबाबतची भूमिका अस्पष्टच आहे.

दुसरीकडे  नगर दक्षिण मतदारसंघाच्या जागेवरून आघाडीत अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे-पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तरी ते उभा राहणार असल्याचेच बोलले जात आहे. यागोदर त्यांनी तालुकानिहाय दौरे करून लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनचं त्यांनी जिल्हाभर वातावरण निर्मिती केली आहे. या मतदारसंघाचा जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल, अशी शक्यता असून त्यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत.

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनीही भाजपा उमेदवारी अपेक्षेतून तालुकानिहाय गाठीभेटी सुरू केल्या असल्या, तरी यात येणारी गटातटाची विघ्ने त्यांच्या कार्यकर्त्यांना सतावत आहेत. त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनाही या मतदारसंघातून भाजपा उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केल्याने हे मोठे वादंग तयार होण्याची शक्यता आहे.

विद्यमान खासदार गांधी यांची दिल्लीत असणारी लॉबी सर्वश्रूत असल्याने गांधी हेच उमेदवार असे त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पंरतु जर तरच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे वाटत आहे.

भाजपातील अंतर्गत गटबाजी व सक्ष्म उमेदवार पाहता आमदार राजळे यांनी भाजपाची उमेदवारी करण्यासाठी त्यांना पक्षपातळीवर गळ घातली जात आहे. त्यात दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या आ. राजळे या एकमेव पुन्हा निवडून येऊ शकतात, असा चाणक्य एक्झिट पोलचा अहवाल आल्याने लोकसभेसाठी त्यांना आग्रह होत आहे. पंरतु दिवंगत मा. आ. राजीव राजळे नसल्याने आ. मोनिका राजळे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे दोन तीन महिने बाकी असून यासाठी बरीच खलबते होणार असल्याने राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.