fbpx

पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलण्याची आवश्यकता – बच्चू कडू

bacchu kadu new

टीम महाराष्ट्र देशा : पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. पैसा असल्याशिवाय निवडणुकीत माणूस निवडून येत नाही अशी परिभाषा सध्या झाली आहे,असेही त्यांनी म्हंटले. पुण्यात ते बोलत होते. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून पुण्यात आदर्श कार्यकर्ता गौरव समितीचा पहिला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान बच्चू कडू बोलत होते.

सध्या पैसा असल्याशिवाय निवडणुकीत माणूस निवडून येत नाही अशी परिभाषा झाली आहे. त्यामुळे पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलण्याची आवश्यकता आहे ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांवर आहे. केवळ पैसा खर्च करू शकणाऱ्या तिकीट देणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी याबाबत प्रश्न विचारला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर सध्याच्या काळात कार्यकर्ता मिळणेही अवघड झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत कार्यकर्ता टिकणे आवश्यक आहे. आता नेता बनणे सोपे झाले आहे. अलीकडील राजकारणात विकृती आली आहे. हे संपविण्याचे काम कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, अधिकाऱ्यांना मारहाण करणे, हा माध्यमांमुळे लोकांपुढे मांडलेला माझा चेहरा आहे. मात्र, अन्य मार्गानेही आम्ही आंदोलने करतो. रस्ता होत नाही, म्हणून रक्तदान करून आंदोलने केली, ते जनतेसमोर आले नाही. त्यामुळे माध्यमे दाखवतात तोच चेहरा लोकांसमोर येतो, असेही त्यांनी म्हंटले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, विपश्यना मार्गदर्शक दत्ता कोहिनकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र जगताप, कार्याध्यक्ष विजयकुमार मर्लेचा आदी यावेळी उपस्थित होते.