fbpx

माढा : मोहिते-पाटलांना तयार राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा जागेकरिता भाजपचा उमेदवार कोण असेल याकडे सगळ्यांची नजर आहे. शरद पवार यांनी या जागेवरून माघार घेतल्याने चर्चेत आलेल्या माढ्याचा तिढा राष्ट्रवादी कॉंग्रेसने संजय शिंदे यांना उमेदवारी देऊन सोडविला आहे, मात्र भाजप उमेदवार अजून देखील ठरत नाही. अशात विजयसिंह मोहिते- पाटील पिता पुत्रापैकी एकाला भाजपची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या दोघांपैकीच एकाला उमेदवारी मिळण्याचं जवळपास निश्चित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र भाजपने अद्याप त्यांची उमेदवारी होल्डवर ठेवली आहे.