सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा येणार मोहिते राज !

सोलापूर: शह, काटशहाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीत नाराज असलेले खासदार विजयसिंह मोहिते हे पुन्हा पक्षात सक्रिय होऊ लागल्याचे दिसून येत आहे. १७ डिसेंबरला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जानेवारी मध्ये खासदार शरद पवार अकलूजला येत आहेत. त्यातून नव्याने पण तीच राजकीय जुळवाजुळवीची तयारी झाली अाहे.

राष्ट्रवादी स्थापनेनंतर बारामतीकरांनी हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित करार झाला होता. जिल्ह्याचे नेतृत्व विजयसिंह मोहिते यांच्याकडे होते, तोपर्यंत राष्ट्रवादीचे पूर्णपणे वर्चस्व होते. नंतर अजित पवार यांनी थेट हस्तक्षेप करायला सुरुवात केल्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार विजयसिंह मोहिते असे दोन गट पडले. पवार-मोहिते यांच्या राजकीय कलहामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली.

जिल्ह्याचे प्रभारीपद घेऊनही अजित पवारांना जिल्हा सावरता आला नाही. पक्षावर नाराज खासदार मोहिते यांनी थोडे बाजूला राहणे पसंद केले. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. मोदी लाटेतही माढा लोकसभेची जागा कायम रखण्याची किमया त्यांनी साधली. त्यावेळी अजित पवार ब्रिगेडने मोहिते यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. हे माढा करमाळ्यातील मतांवरून दिसले.

Loading...

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानिमित्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे १७ डिसेंबर रोजी अकलूज येथे येणार आहेत. त्याशिवाय पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारही जानेवारीत अकलूज येथे येत आहेत. हे दौरे राजकीय नसले तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चर्चेत आणणारेच अाहेत.सोलापूर येथील पक्षाच्या बैठकीला पंढरपूर येथील कार्यक्रमात त्यांची असणारी उपस्थिती चर्चेचा विषय बनून गेली. ग्रामीण भागात सोशल मीडियातूनही खासदार मोहिते यांच्या सक्रियतेबद्दल खूप गाजावाजा झाला. जिल्ह्यात पक्षाला गतवैभव मिळवायचे असेल तर जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी मोहिते यांच्याकडे देण्याबाबतचे सूर उमटू लागले आहेत