वसंतोत्सव; स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे ही भाग्याची गोष्ट- भागवत

Mohan Bhagwat addressing during Vasantotsav (2)

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वसंतोत्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जिवंत प्राण्यांना उपजतच संगीताचे आकर्षण असते पण जेव्हा साधना झाल्यानंतरचे स्वर कानी पडतात ती अवस्था अप्रतिम असते. अशा स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे हीच मुळात भाग्याची गोष्ट आहे, त्यामुळे ती स्वीकारत दोन वर्षे उशीरा का होईना मी इथे आलो याचा मला आनंद आहे या शब्दात भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

Pt.Kumar Bose (L) and Pt. Anindo Chatterjee (R) performing during Vasantotsav

प्रसिद्ध तबलावादक पं अनिंदो चटर्जी आणि पं. कुमार बोस यांची तबलावादनाच्या जुगलबंदीने आज ११ व्या वसंतोत्सवाला सुरुवात झाली. दोन दिग्गज कलाकार आज वसंतोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले त्यामुळे रसिकांनाही सुश्राव्य तबलावादन ऐकण्याची संधी मिळाली. यावेळी या दोघांनी तीन ताल, तोडे, तुकडा सादर करीत आपल्या तबलावादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तन्मय देवचक्के यांनी संवादिनी तर फारुख लतीफ खान यांनी सारंगीची साथसंगत केली.

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात द्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आपली गायनकला सादर केली. त्यांनी राग दरबारी कानडाने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांना चैतन्य कुंटे (संवादिनी), निखील फाटक (तबला), संहिता चांदोरकर व ऋषिकेश पाटील (गायन) यांनी साथसांगत केली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध ख्याल गायक आणि बंदिशकार विजय बक्षी यांचा पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृती निमित्त देण्यात येणारा पुरस्कार देत गौरव करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे आणि पं. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे यांच्या हस्ते बक्षी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती महोत्सवाचे आकर्षण ठरली

काय म्हणाले मोहन भागवत ?

‘‘जिवंत प्राण्यांना उपजतच संगीताचे आकर्षण असते पण जेव्हा साधना झाल्यानंतरचे स्वर कानी पडतात ती अवस्था अप्रतिम असते. अशा स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे हीच मुळात भाग्याची गोष्ट आहे, त्यामुळे ती स्वीकारत दोन वर्षे उशीरा का होईना मी इथे आलो याचा मला आनंद आहे.संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. ती आपली आपलेपणाची अभिव्यक्ती आहे. मनाला एका उन्नत अवस्थेत घेऊन जाणारी ही एक कला आहे. त्यात साधना झाल्यानंतरचे जे स्वर कानी येतात, त्याचा आनंद तर अप्रतिमच असतो. असे संगीत ऐकणे भाग्याचीच गोष्ट आहे. ती मी अनुभवत आहे,’’ अशा शब्दांत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ‘वसंतोत्सव’ अधिकाधिक फुलत राहावा, असे सांगत त्यांनी श्रोत्यांमध्ये बसून राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाचा आस्वाद घेतला. ‘