जे त्यांच्या मूळ देशाला धोकादायक ठरत आहेत ते आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील’?-भागवत

mohan-bhagwat

वेब टीम:’रोहिंग्या नागरिक त्यांच्याच मूळ देशासाठी धोकादायक ठरत आहेत. मग त्यांना आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील’ असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (शनिवार) उपस्थित करत रोहिंग्या निर्वासितांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेस पाठिंबा दिला.या सोहळ्याला संत निर्मल दास बाबा यांची प्रमुख आथिती असून शिवशाहीर ,बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला.आजच्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीयत्त्व, भारतीय संस्कार, मूल्ये, देशीवाद, भारतीय अर्थव्यवस्था, गोरक्षा, सीमावर्ती भागातील समस्या आदी मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले.

मोहन भागवत यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
‘डोकलाम प्रश्नी भारताने घेतलेली भूमिका ही देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक होते’ अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविणाऱ्या घटकांना रोखण्यातही केंद्र सरकारला यश मिळत आहे, असे ते म्हणाले. ‘राष्ट्रविरोधी घटकांना मिळणारे अर्थसाह्य बंद करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली. दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा संबंध असल्याचेही वेळोवेळी सिद्ध होत आहे’

म्यानमारमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्यामुळे त्या सरकारने रोहिंग्या निर्वासितांविरोधात कारवाई सुरू केली. जागतिक पातळीवर मानवतावाद दाखविताना आपल्या देशातील सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत नाही ना, हेही पाहावे लागेल. बांगलादेशमधून होणाऱ्या घुसखोरीवर अद्याप आपण तोडगा काढू शकलेलो नाही. त्यातच आता ही समस्या उभी ठाकली आहे. आपण या लोकांना (रोहिंग्या) भारतात राहण्याची परवानगी दिली, तर इथल्या रोजगाराच्या संधींवरही त्याचा परिणाम होईल. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेलाही ते धोकादायक असेल.”

आपल्या मनावरील परदेशी संस्कृतीचा पगडा काढून टाकायला हवा. आपल्या देशातील थोर महापुरूषांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी करून ठेवल्या आहेत. पण आपलं त्याकडं लक्ष नाही. परदेशातील लोकांनी त्या लक्षात आणून दिल्यावरच आपल्या विद्वानांना त्या पटतात, असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्या भाषणाच्या सुरूवातीला मोहन भागवत यांनी काल मुंबईतील एलफिन्स्टन स्थानकात घडलेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मात्र, आपल्याला अशा संकटांवर मात करून पुढे जावे लागेल. विजयादशमीचा सण हाच संदेश देतो, असे त्यांनी म्हटले. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्र सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा निव्वळ अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.