शमीची पत्नी हसीन जहाँने घेतली ममता बॅनर्जींची भेट

shami, mamata, haseen

टीम महाराष्ट्र देशा- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान हसीन जहाँने ममता बँनर्जींकडे मोहम्मद शमीविरोधात केलेल्या आरोपांचा ३ पानी अहवाल दिला असून आपल्याला ममता दीदींनी आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं हसीन जहाँ म्हणाली. पश्चिम बंगालच्या विधान भवनात ममता दीदी आणि हसीन जहाँची १० मिनीटांसाठी भेट झाल्याचं समजतंय.
दरम्यान,पत्नीसोबत सुरु असलेल्या वादादरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयनं शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे. तसंच त्याला बीसीसीआयच्या कॉन्ट्र्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतही स्थान देण्यात आलं आहे.

शमीच्या चौकशीसाठी बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती अँटी करप्शन युनिटने शमीला क्लीन चिट दिली आहे. तसंच त्याला बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बी श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता शमीला 3 कोटीचं मानधन मिळणार आहे.

येत्या ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतही शमीचा दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. शमी दक्षिण आफ्रिकेवरुन परतताना दुबईमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतले असा आरोप हसीन जहाँने केला होता. शमी मॅच फिक्सिंग करत असल्याचा आरोपही तिने केला होता.

मी प्रचंड दबावाखाली होतो पण आता बीसीसीआयने क्लीनचीट दिल्यामुळे मी चिंतामुक्त आहे. माझी देशाबद्दलची कटिबद्धता आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे मी दुखावलो होतो. पण माझा बीसीसीआयच्या चौकशी समितीवर विश्वास होता. आता माझ्या मनात पुन्हा मैदानावर परतण्याचा विचार सुरु आहे असे शमीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.मागच्या दहा-पंधरा दिवसात मी खूप काही सहन केले आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे मी प्रचंड दबावाखाली होतो असे शमीने सांगितले.