सैनिकाच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ‘त्याने’ सोडला रोजा

ashfak

टीम महाराष्ट्र देशा: रमजानचा पवित्र महिना सुरु असून बिहारमधील दरभंगा येथील मोहम्मद अशफाक या युवकाने रोजा ठेवला होता. मात्र दोन दिवसांच्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी या युवकाने रोजा सोडला. त्यामुळे धर्मा पलीकडच्याही मानव धर्माचे याठिकाणी दर्शन झाले. एका नवजात चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी तिला रक्त देणं गरजेचं होतं म्हणून तिला रक्त देण्यासाठी अशफाकने रोजा सोडला.

रमेश सिंह या जवानाला दोन दिवसांपूर्वी मुलगी झाली. पण मुलगी जन्माला आल्यावर तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मुलीला रक्ताची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, अशफाक रक्तदान करायला तयार झाला. पण काही न खाता रक्तदान करणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं.

मुलीचा जीव वाचवणं त्याला योग्य वाटल्याने अशफाकने रोजा सोडून रक्तदान केलं. ‘एखाद्याचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सुरक्षा रक्षकाची ती मुलगी आहे यामुळेच मला प्रेरणा मिळाली’, असे मोहम्मद अशफाक म्हणाला. त्यामुळे दरभंगा- बिहारच्या दरभंगामधील अशफाकचे सध्या सगळीकडून कौतुक होत आहे.